गोंदवले हे आपले माहेर आहे. आपला नोकरी धंदा-सांभळून,जसे-जमेल-तसे आपण येथे दोन-तिन दिवसांसाठी येतो,नाम घेतो,हसतो,खेळतो,सेवा करतो,प्रसाद घेतो आणि दोन तिन दिवसांनी पिले जशी घरट्यातून भूर्र्कन उडून जातात तसे आपापल्या घरी जातो,मग पुन्हा नविन भक्त मंडळी सेवेस येतात. असे सतत सुरु असते. पौर्णिमावारी,पुण्यतिथीउत्सव,गुरुपौर्णिमा,रामनवमी,हनुमान जयंती,इत्यादी विशेष प्रसंगी जरा जास्त गर्दी होते. बर्याचदा काही दूरुन येणर्या मंडळींना येथे अव्याहत १००हून अधीक वर्षे चाललेल्या ’रामनाम’ उपासने विषयी फारशी माहीतीहि नसते,तरिही गोंदवल्याला आली की अशी माणसेही नकळत नित्योपासनेत रमून जातात. बर्याचदा येथे मंडळी आपापल्या अडचणी श्रींच्या कानावर घालायला,किंवा काही अध्यात्मिक शंकांचे निरसन करायला तर कधी श्रींना पाहून बरेच दिवस झाले म्हणून नुसते दर्शनाला येतात.
असे आपण काही-ना-काही उद्देश मनात धरुन गोंदवल्याला जातो. परंतू तिथे गेल्यावर आपल्या येण्याचा उद्देशच विसरतो. श्रीमहाराजांचे प्रेम आपाल्याला,व्यावहारिक / प्रापंचिक प्रश्नांचा विसर पाडायला लावते. आजच्या वैज्ञानिक युगात आपल्याकडे सुविधा –पैसा –तंत्रज्ञान इत्यादी सारे आहे,काय नाहि तर तो ’वेळ’. वेळे अभावी अनेक मंडळींना गोंदावल्याला आले आणि मोठी देणगी दिली की झाले असे वाटते. श्री महाराजांनी हा जो ’हरीहाट’ भरविला आहे तो का या साठी आहे?
या वर्षी देशाच्या अनेक भागात पाण्याअभावी दुष्काळ सदृश्यपरिस्थीती आहे. शहरी भागात तंत्रज्ञानामूळे याची विशेष झळ बसत नसली तरी ग्रामीणजनता मात्र दुष्काळाने अगदी त्रस्त झाली आहे. अनेक दुष्काळ्ग्रस्त तालुक्यात गोधन सुरक्षित रहावे यासाठी ’चारा-छावण्या’ उभारल्या आहेत. शेतकरी अगदी बेजार होत आहेत. स्त्रिय़ांचे दुःख अश्रूंच्यावाटेच मोकळे होते. धरणीमाता अगदी मलूल झाली आहे. अनेक शेतकरी पिक चांगले न झाल्याने हवालदिल झालेत. कोरड्यापड्लेल्या विहीरि,रणरणत्या उन्हात पाण्यासाठी होणारी माता-भगिनींची पाय-पिट,हे सारे वातानुकूलित गाड्यांमधून फिरताना कसे जाणवणार? तंत्रज्ञान विकसित झाले तरी अनियमित पाऊस-पाणी आणि निसर्गदेवता यांवर काहीच उपाय नाही. अशा परिस्थीतित वागावे तरी कसे. नुसता ’पैका’ हा लटका आहे. पैशाने सुख मिळेल पंण समाधान कसे मिळवायचे. आता यासाठी नुसते ’अश्रू’ ढाळूनही काम होणार नाही किंवा नुसत्या देणग्यांनीहि काम होणार नाही. इथे हवे ते श्रमदान,इथे हवा तो घाम.
आपण सारी श्रींची लेकरे आहोत,आपल्याला आपल्या गोंदवल्याच्या आईने काय शिकवले आहे,तर –।। मुखी नाम,हाती प्रपंचाचे काम । ऐसा जोडा राम मनी ।। येथे श्रींनी १८७६ साली केलेल्या दुष्काळी कामाची आठवण झाल्याशीवाय कशी राहील ! औधच्या संस्थानीकांनीहि श्रींनी केलेल्या नेत्रदिपक कामगिरिची तोंड्भरून स्तुती केली. चला तर मग आपणही काही सेवा करुया,प्रसिद्धि –पैसा –भेदभाव सारे बाजूला ठेऊन खांद्याला खांदा लावून काम करुया आणि नाम घेउया. हे श्रींचे पुण्यतिथीचे शताब्दि वर्ष आहे. श्रींचे चरणी नाम-सगुणपुजा-गोसेवा-अन्नदान हि चार फुले वाहूया. जर कोणाला काही कारणास्तव यापैकी काहिच जमले नाहितरं निदान ’शुभेच्छा’ तरी काम करतिलचं करतिल. . . मग आता सारे सज्ज होउ . . . चला श्रमदान करु. . .
Recent Comments